केज दि.०४ – चुकीचा पिटीआर देऊन ग्रामसेवक धनराज अंबादास सोनवणे व सरपंच अमर सोपान राऊत यांनी पदाचा गैरवापर केल्याची तक्रार करत कानडी माळी येथील एकाने केज पंचायत समिती समोर उपोषण सुरू केले होते. दरम्यान 26 जानेवारीला उपोषण सुरू करूनही प्रशासनाने वेळीच दखल घेतली नव्हती मात्र उशिरा का होईना सदरील प्रकरणी कारवाई करण्यात आली असून ग्रामसेवकाची बदली करण्यात आली असून चौकशी समिती नेमून सखोल चौकशी करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे
कानडी माळी येथील अर्जुन रावसाहेब खाडे या व्यक्तीच्या जागेवर इतरांनी अतिक्रमण करून जागेवर ताबा घेतला असल्याची तक्रार करण्यात आली होती. मागच्या अनेक वर्षांपासून अर्जुन खाडे हे न्याय मिळण्यासाठी सरकारदरबारी खेटे घालत आहेत.परंतु न्याय न मिळाल्याने शेवटी त्यांनी 26 जानेवारी रोजी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र त्याची वेळेवर दखल घेतली नसल्याची तक्रारही करण्यात आली होती.
दरम्यान सदरील प्रकरण जास्त चिघळण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने कारवाई करत ग्रामसेवक धनराज सोनवणे यांची बदली करण्यात आली असून चौकशी समिती नेमून सदर प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे व दोषी आढळल्यास ग्रामसेवक व सरपंचावर कठोर कारवाई करण्याचे पत्र अर्जुन खाडे यांना दिले असून खाडे यांनी तूर्त उपोषण स्थगित केले आहे. त्यामुळे सदरील चौकशीत नेमके काय सत्य समोर येते ?ते पाहावे लागणार आहे.