Site icon सक्रिय न्यूज

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

केज दि.१२ – मागच्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करत आहेत. मात्र अद्यापही सदरील कर्मचारी व अधिकाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेतलेले नाही. त्यामुळे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सर्व कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मागच्या दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

       राष्ट्रीय आरोग्य अभियानात हजारो आरोग्य कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे २०१० पासून सदरील कर्मचारी नियमित सेवेत समायोजन करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत अनेक मोर्चे आंदोलने करूनही सदरील मागणीची दखल घेतलेली नाही. दरम्यान संबंधित प्रश्नी दोन समित्यांची स्थापना करण्यात आली. तर एका समितीने २०१९ मध्ये समायोजन करण्याच्या बाजूने अहवाल देऊनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे हजारो कर्मचारी आपल्या हक्कापासून वंचित आहेत.
       दरम्यान कोरोना काळातही सदरील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. केज येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या समोर तालुक्यातील  एस.बी. थळकरी, यु.एस.जायभाय, आय.आय.शेख, ए. पी.शिंदे, के.एस. डिसले, एस.एस. थोरात, एस.पी.सपकाळ, के.बी.तुपारे, एस.एम.मस्के, ए. व्ही. ससाणे, सोमेश स्वामी, डी. पी. सपकाळ इत्यादी कर्मचारी काम बंद आंदोलन पुकारून धरणे आंदोलन करत आहेत.
       नियमित सेवेत सामावून घेऊन सर्व लाभ देण्याची मागणी करण्यात येत आहे. तर सदरील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने ऐन कोरोनाच्या संकटात नियमित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.
——————————————————-
जिल्हास्तरावर माहिती दिली आहे – डॉ.आठवले
         तालुका आरोग्य सेवेत असणारे कंत्राटी कर्मचारी काल पासून कार्यालयाच्या समोर काम बंद आंदोलन करत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन माझ्याकडे दिल्यानंतर ते जिल्हास्तरावर पाठवण्यात आले आहे. तर संबंधित प्रश्नी वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय सुरू असून एकदोन दिवसांत कांहीतरी तोडगा निघेल अशी प्रतिक्रिया केज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी सक्रिय न्युज शी बोलताना दिली.

——————————————————
शेअर करा
Exit mobile version