पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शरणापूर शिवारात घडली आहे. या घटनेमुळे शरणापूर परिसरावर शोककळा पसरली आहे. आज दुपारी अग्निशमन दलाच्या जवानांनी या तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. यावेळी अवघा गाव गोळा झाला होता. काही वेळापूर्वी पोहण्यासाठी गेलेल्या या मुलांचा एवढ्या दुर्दैवी अंत होईल, अशी कल्पानाही कुणी केली नव्हती. मात्र पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्यामुळे मुलांचा मृत्यू झाला, असावा, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.
याविषयी हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शरणापूर शिवारात भांगसी गड पायथ्याशी नारायण वाघमारे यांचे शेततळे आहे. या तळ्यावर सायकलवर फिरण्यासाठी ही मुले गेली होती. तळ्यावर पोहोचल्यावर ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत मरण पावलेल्या मुलांमध्ये प्रतिक आनंद भिसे (15) ,तिरुपती मारोती इंदलकर (15), शिवराज संजय पवार (17) यांचा समावेश आहे.
दरम्यान, सकाळी शेततळ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या मुलांचा या पद्धतीने करुण अंत होईल, याची कल्पानाही कुणी केली नसेल. मात्र शिवारात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अग्निशामक दलाने या मुलांचे मृतदेह बाहेर काढले, त्यानंतर अवघा गाव सुन्न झाला.