Site icon सक्रिय न्यूज

शेत रस्त्यासाठी मालका सोबत गाईचेही आमरण उपोषण……! 

शेत रस्त्यासाठी मालका सोबत गाईचेही आमरण उपोषण……! 
केज दि.२१ –  तालुक्यातील भालगाव येथील स्वतः च्या शेतात जाण्यासाठी नंबर बांधावरून शेत रस्ता देण्याच्या मागणीसाठी केज तहसील कार्यालया समोर पती-पत्नी हे गाईसह आमरण उपोषणाला बसले होते. त्यांची रिपाइंचे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी मध्यस्ती करून उपोषण सोडविले.
            भालगाव येथील मागासवर्गीय शेतकरी अंकुश बनसोडे यांचे वडील महादेव बनसोडे यांच्या नावे भालगाव शिवारात सर्व्हे नंबर ३७/४ मध्ये१.१७ आर जमीन आहे. ती जमीन अंकुश यांचे कुटुंब कसत आहे. त्या जमिनीत त्यांनी १.०० हेक्टरमध्ये ऊस लागवड केली असून ऊस १४ महिन्याचा आहे. मात्र त्यांच्या शेतात जाण्या-येण्यासाठी सर्वे नंबर ३७ व सर्व्हे नंबर ५२ यांच्या सामाईक बांधावरून नंबर बांधाचा शेत रस्ता नसल्यामुळे त्यांच्या उसाची तोडणी करून कारखान्याला घेऊन जाता आला नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. या पूर्वीही या शेत रस्त्यासाठी अंकूश बनसोडे यांनी उपोषण केले होते. त्या संदर्भात तहसीलदार केज यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश देऊनही सदर रस्ता खुला केलेला नाही. म्हणून दि. २१ फेब्रुवारी सोमवार रोजी अंकुश बनसोडे त्यांची पत्नी शोभा बनसोडे हे त्यांच्या गाईसह नंबर बांधाच्या शेत रस्त्यासाठी केज तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले होते.
                 दरम्यान रिपाइंचे कार्यकर्ते गौतम बचुटे यांनी या प्रकरणी रिपाइंचे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्याशी व उपिषणार्थीशी संपर्क साधला. नंतर रिपाई अध्यक्ष दीपक कांबळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी तहसीलदार साहेबांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शेत रस्त्या संदर्भात चर्चा केली. त्या नंतर त्यांनी उपोषणार्थीनी यांना पाणी देऊन त्यांचे उपोषण सोडविले.
                   या वेळी वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, रिपाइंचे शहराध्यक्ष भास्कर मस्के, रविंद्र जोगदंड, दिलीप बनसोडे, ग्रामसेवक ओम चोपणे, आरेफ तांबोळी हे उपस्थित होते.
शेअर करा
Exit mobile version