केज दि.२४ – तालुक्यातील विडा येथे बापानेच आपल्या पोटच्या पोराचा दारूच्या नशेत डॊक्यात दगड घालून खून केला होता. त्या प्रकरणी अंबाजोगाई सत्र न्यायालयाने बापाला सात वर्षाच्या सक्त मजूरी व दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
केज तालुक्यातील विडा येथील भागवत अश्रूबा जाधव याने दारू पिण्याचे व्यसनामुळे कर्ज केले होते. त्यामुळे भागवत जाधव याने त्याची एक एकर शेती कर्ज फेडण्यासाठी विकली होती. त्यामुळे त्याचा मुलगा यशवंत उर्फ अण्णा जाधव हा वडील भागवत जाधव यास समजावून सांगत होता. त्यातून बापलेकात नेहमी भांडणे होत असत. त्यातच दि. ३१जुलै रोजी सायंकाळी ४:३० च्या दरम्यान दारू पिण्याच्या कारणा वरून त्या दोघा बाप-लेकात घरात भांडण झाले. भांडणात भागवत जाधव याने मयत यशवंत उर्फ अण्णा जाधव याचे डोक्यात व तोंडावर दगडाने मारून गंभीर जखमी केले. जखमी मुलाला गावकऱ्यांनी उपचारासाठी दवाखाण्यात नेले. परंतु गंभीर दुखापतीमुळे व रक्तस्त्रावामुळे यशवंत उर्फ अण्णा जाधव उपचारादम्यान मरण पावला. सदर घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, सपोउनि महादेव गुजर, शिवाजी शिनगारे, बाळकृष्ण मुंडे, श्रीराम चेवले यांनी अवघ्या काही तासातच आरोपी भागवत जाधव यास ताब्यात घेतले होते.
या प्रकरणी मयत यशवंत उर्फ अण्णा जाधव यांची आई विजुबाई भागवत जाधव हिच्या फिर्यादी वरून मुलगा यशवंत उर्फ अण्णा जाधव यास ठार मारल्या प्रकरणी भागवत अश्रुबा जाधव यांच्या विरोधात गु. र. नं. २९५/२०२० भा. दं. वि. ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांनी करून अंबाजोगाई सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
दरम्यान, अंबाजोगाई येथील मा. सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापटनेकर यांच्या पुढे चालू असलेल्या सत्र प्रकरण क्र. ५१/२०२० महाराष्ट्र शासन वि. भागवत जाधव रा. विडा ता. केज या प्रकरणा मध्ये आरोपी भागवत जाधव यास या प्रकरणात फिर्यादी तर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील एस. व्ही. मुंडे याचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सत्र न्यायाधीश एस. एस. सापटनेकर यांनी आरोपी भागवत अश्रूबा जाधव यास सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे.