केज दि.२५ – चालत्या टेम्पोवर चढून अज्ञात चोरट्यांनी टेम्पोवरील ताडपत्री फाडून २३ हजार ९२२ रुपयांचे पंतजली दूध बिस्कीटचे २७ बॉक्स लंपास केल्याची घटना मांजरसुंबा – केज रस्त्यावर घडली. याप्रकरणी केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील सुर्डी ( सोनेसांगवी ) येथील टेम्पो चालक मुफ्तार सोबलाल शेख हे जालना येथून टेम्पोत ( एम. एच. ४४ – ५८८५ ) पंतजली दूध बिस्कीटचे ५०० बॉक्स भरून बेंगलोरकडे निघाले होते. २२ फेब्रुवारी रोजी रात्री मांजरसुब्याकडून केजकडे येत असताना या रस्त्यावर रात्री ८.४५ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चालत्या टेम्पोवर पाठीमागून चढून टेम्पोच्या वरच्या बाजूची ताडपत्री फाडली. टेम्पोतील २३ हजार ९२२ रुपयांचे पंतजली दूध बिस्कीटचे २७ बॉक्स लंपास केले. केज येथील शारदा शाळेजवळ आल्यावर टेम्पो चालक मुफ्तार शेख यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मंगेश भोले हे करीत आहेत.