केज दि.२७ – आम्ही अन्न भेसळ निरीक्षक आहोत, तुमच्या टपरी व रसवंतीचा परवाना आहे का ? असे म्हणून धमकवणाऱ्या दोघांना केज पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द येथील ज्ञानेश्वर आत्माराम आंधळे व हिरामण पांडुरंग नागरगोजे हे दोघे तोतया अन्न भेसळ निरीक्षक म्हणून मस्साजोग येथील एका पान टपरी व रसवंती वर जाऊन गुटखा मागितला व तुमच्या टपरी चा परवाना आहे का म्हणून धमकावले. तसेच केज शहरातही उपजिल्हा रुग्णालया समोरील एका हॉटेलवर जाऊन असाच प्रकार केला. परंतु मस्साजोग येथील पान टपरी वाल्याने तुमचे आय कार्ड दाखवा असे म्हटले असता त्यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता लोकांनी त्यांना पकडून पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता, पोलिसांच्या तपासाअंती गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान अश्या प्रकारे कुणी तोतयागिरी करून फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन एएसपी पंकज कुमावत यांनी केले आहे.