केज दि.३ – तालुक्यातील विडा येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने एका मटका बुक्कीवर धाड टाकून एकास ताब्यात घेतले.
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना एका गुप्त खबऱ्या कडून माहिती मिळाली की, केज तालुक्यातील विडा येथे हॉटेल राधे समोर एक व्यक्ती ही त्याच्या फायद्यासाठी आमिष दाखवून मटका खेळवत आहे. मिळालेल्या माहिती आधारे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पोलीस नाईक दिलीप गित्ते यांना कारवाई चे आदेश दिले. त्या नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धनपाल लोखंडे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे व पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांनी विडा येथे जाऊन सायंकाळी ५ वा. च्या दरम्यान धाड टाकली. त्यावेळी बस स्टँड विडा येथील हॉटेल राधे समोरील मोकळ्या पटांगत अजय पांडुरंग कुंभार हा मटका खेळवीत होता. काही लोक मटका खेळत होते. पोलीसांना पहातच मटका खेळणारे पळून गेले आणि मटका बुक्कीचा एजंट अजय पांडुरंग कुंभार याला पोलीसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. पंचा समक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे रोख ५ हजार ३४० रु., मोबाईल व मटक्याचे साहित्य असे एकूण १५ हजार ३४० रु. चा मुद्देमाल पंचा समक्ष हस्तगत केला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सागितले की, तो १० टक्के कमिशनवर स्वप्नील वाघमारे आणि अनिल ढोबळे यांच्यासाठी मटका घेत आहे.
पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादी वरुन अजय कुंभार, स्वप्नील वाघमारे व अनिल ढोबळे या तिघां विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२(अ) नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.