अकोला दि.८ – आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप बनवून यूट्यूबवर अपलोड करुन चार हजार लोक कोट्यधीश झालेत, त्यांच्यामुळेच आपण अडचणीत आलो असून अशांची मुलं दिव्यांग जन्माला येतील असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं आहे. अकोला शहरातील कौलखेड भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन अयोजित केलं होतंय. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्यं केलं.
इंदुरीकर महाराज म्हणाले की, “आपल्या कीर्तनाचे व्हिडीओ अपलोड करून आतापर्यंत चार हजार लोकांनी यू्ट्यूबवर कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यांच्यामुळेच मी अडचणीत आलो आहे. आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. ” आपल्या कीर्तनातून यूट्यूबवर व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांवर घसरणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी या आधीही अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. अपत्य जन्माच्या बाबतील त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते त्यांच्या अंगलट आलं होतं.
दरम्यान, कांही महिन्यांपूर्वी एका वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यात न्यायालयानं इंदुरीकरांना दिलासा दिला असून त्यांच्या विरोधातील खटला रद्द करण्यात आला आहे.