Site icon सक्रिय न्यूज

ऑगस्ट पर्यंत अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार….!

लॉकडाउनमुळे दहावी-बारावीचे निकाल अद्याप जाहीर झाले नाहीत. मात्र, जुलैअखेर निकाल जाहीर होणार असून 1 ते 31 ऑगस्टपर्यंत अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर 1 सप्टेंबरपासून प्रथम वर्षाचे अध्यापन सुरु केले जाईल, असे पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार द्वितीय, तृतीय व अन्य वर्षाच्या अध्यापनास 1 ऑगस्टपासून सुरवात होणार आहे, असे परिपत्रक पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना पाठविले आहे.
कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडील उपलब्ध साधनांचा अंदाज घेऊन ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
त्याअनुषंगाने शिक्षक, प्राध्यापकांनी ई-कन्टेन्ट तयार करावा, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले असून प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांचे एक हजार तासांचा अभ्यासक्रम तयारही झाला आहे. कुडल, गुगल क्‍लासरूम, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिमचा वापर करुन शिक्षण चालू ठेवावे असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तत्पूर्वी, सर्व महाविद्यालयांनी त्यांचा आराखडा 1 ऑगस्टपूर्वी सादर करावा, असे विद्यापीठांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रातील महाविद्यालये आणि तेथील प्राध्यापकांकडून अर्ज भरून घेऊन त्यांना वर्क फ्रॉम होमची सोय करुन द्यावी, असेही विद्यापीठांनी सांगितले आहे. तर सत्राच्या पहिल्या दिवशी हजेरी पत्रकावर संबंधित प्राध्यापकांना स्वाक्षरी करणे बंधनकारक करु नये, अशा सूचनाही दिल्या आहेत. दरम्यान, अंतिम वर्षातील परीक्षा रद्द झाल्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंगळवारी (ता. 16) पुन्हा एकदा स्पष्ट करण्याची शक्‍यता आहे.

शेअर करा
Exit mobile version