शिराळा दि.१६ (अमोल पाटील) – स्वतःच्या आर्थिक,सामाजिक उन्नती करता महिलांनी एकत्र येणे व वेगवेगळे उद्योग व्यवसाय स्वतःच्या ताकदीवर उभारणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत सनविवि च्या संपादक गीता पाटील यांनी केले.झलकारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, झलकारी ग्रामसंघ, राजमाता जिजाऊ ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण,स्नेहमेळावा व महिला बचत गटाच्या मेळाव्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना गीता पाटील यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा व संस्थांचा कला प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.कला हस्तकला प्रेरणा पुरस्काराने स्मिता राजेश खामकर यांना ,ललित कला प्रेरणा पुरस्काराने प्रतीक्षा भगवान जाधव यांना ,कला सामाजिक न्याय हक्क प्रेरणा पुरस्काराने विजया काचावार यांना , कला प्रबोधन पुरस्काराने अपूर्वा पाटील यांना ,कला समाजसेवा पुरस्काराने नंदा जाधव यांना , कला सक्षमीकरण प्रेरणा पुरस्कार कलगोंडा पाटील सेवा संस्था आरग या संस्थेस प्रदान करण्यात आला.स्मृतिचिन्ह,शाल,पुस्तक, फेटा पुष्प असे या पुरस्काराचे स्वरूप होते.या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून बोलताना त्या पुढे म्हणाल्या ‘ कला बास्केटच्या माध्यमातून ग्रामीण भागात झलकारी बहुउद्देशीय संस्थेने रोजगार उपलब्ध केला आहेच परंतु महिला बचत गटांच्या या मेळाव्यात उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी सुचवलेला एखाद- दुसरा व्यवसाय नव्याने उभारला गेला व त्यातून अर्थार्जन झाले, महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत असेल तर आज घेतलेल्या महिला बचत गटांच्या मेळाव्याची यशस्विता आहे असे समजावे, असेही गीता पाटील म्हणाल्या. महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी खूप कष्टाने बनवलेली राज्यघटना किती लोकांनी वाचली आहे आणि अभ्यासली आहे हे मला माहित नाही.मात्र मी जवळून पाहिलेली दोन माणसं आहेत की ज्यांनी राज्यघटना वाचून सोपी करण्याचं काम केलं. ती दोन नाव म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि प्राचार्य पी.बी. पाटील होय.
तसेच शर्मा या महिलेने गावातील महिलांना गोधडी अथवा वाकळ विणायचा व्यवसाय दिला यातून तयार झालेल्या गोधडी विकुन येणारा पैसा गावाच्या विकासासाठी व महिलांच्या उन्नतीसाठी वापरला. तिथेही जाऊन आरग येथील महिला बचत गटाच्या सदस्यांनी अभ्यास करावा व मेळाव्यास उपस्थित असणाऱ्या खामकर ताईकडून गोधडी विणण्याचे प्रशिक्षण घ्यावे व आर्थिक विकास साधावा असेही आवाहन यावेळी गीता पाटील यांनी केले.
छत्रपती संभाजी राजांनी आपल्या राजमुद्रे करता आपल्या सौभाग्यवतीचा,पत्नीचा गौरव करणारी मुद्रा तयार करून घेतली होती हा आपला गौरवशाली इतिहास आहे, स्त्रीचा गौरव करणे ही आपली परंपरा आहे हे विसरून चालणार नाही.महात्मा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना स्वातंत्र्याची दारे खुली केली म्हणूनच आपण सगळ्या एकत्र येऊ शकलो या महामानवांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी,तसेच झलकारी संस्थे प्रमाणे इतरही संस्थांनी आदर्श घेऊन महिलांना रोजगार उपलब्ध करुन द्यावेत असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सरिता कोरबू यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी सरपंच विशाखा कांबळे यांनी महिला सबलीकरण करिता बचत गटांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे विशद करताना मिरज तालुक्यातील सगळ्यात मोठा महिला महोत्सव घेतल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. शिवव्याख्याते अपूर्वा पाटील यांचे व्याख्यान झाले या व्याख्यानात बोलताना छत्रपती शिवराय ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पर्यंतच्या महामानवांच्या स्त्रीमुक्तीच्या कार्याचा आढावा यावेळी अपूर्वा पाटील यांनी घेतला.महिलांनी अत्त दीप भव याप्रमाणे स्वतःच स्वतःचा दीपक व्हावा व स्वतःला समृद्ध करावे असे आवाहन अपूर्वा पाटील यांनी मंचावरून केले. अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांच्या लोकनृत्य आविष्कारला ही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आरग तालुका मिरज येथे पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या महिला बचत गटांच्या मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. यात तब्बल तीस बचत गटातील महिला सहभागी झाल्या होत्या.. तर मेळाव्यास ४३८महिलांची उपस्थिती होती.तब्बल १८बचत गटातील महिलांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थ व वस्तूंचा स्टॉल लावला होता. या प्रदर्शनाचे उद्घाटन उमेद या महाराष्ट्र शासनाच्या, पंचायत समिती समन्वयक रेश्मा सातपुते व प्रमुख अतिथी गीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यातील प्रथम क्रमांक विद्या स्वयंसहायता समूहाचा आला. या समूहाने तब्बल पाच स्टॉल लावले होते.महिलांची एकी व कार्यक्षमता पाहून या गटाला प्रथम क्रमांक देण्यात आला.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,पुष्प व पुस्तके भेट देऊन त्यांना गौरवण्यात आले. तर अन्य स्टॉलधारकांना पुस्तक व पुष्प सन्मानपत्र देण्यात आले. स्वागत संस्थेच्या अध्यक्ष शशिकला गावडे यांनी केले प्रास्ताविक साहित्यिक चंद्रकांत बाबर यांनी केले तर आभार नंदिता खटावे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा पांडुरंग कुंभार यांनी केले. यावेळी संजीवनी पाटील, प्रमोद पाटील, सचिन चव्हाण अनिल खटावे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या सचिव अधिका बाबर, सीमा पाटील ,सुप्रिया चव्हाण, अश्विनी इंगळे व सदस्यांनी कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले. तर तुलसी, जन्नत, रमजान , बेबी आयेशा, उमेद ,भारती, समर्थ, शिवशक्ती, सिद्धकला,ईश्वरी,ममता,वत्सला, प्राजक्ता,सरस्वती ,हिरकणी ,पंचशील, राजमार्ग, संविधान, श्री स्वामी समर्थ ,जागृती, झुंजार दुर्गामाता, महाराणी ताराऊ, जय जिजाऊ, विद्या, चेतना ,सृष्टी ,श्री, सखी, मायाक्का, हिरकणी , सूराज्य या महिला बचत गटाच्या संचालक व सदस्य उपस्थित होते.