बीड दि.२२ – माझ्या सत्ताकाळात एकही माणूस माझ्यापासून दुरावला नाही. चांगल काम केले पाहिजे, करुन घेतले पाहिजे. संघर्षाला तयार राहिले पाहिजे. माझे ऑपरेशन झाले. बोलायला घसा दुखतोय आणि बीडच्या बदनामीचं माझ्यावर खापर फोडलं जातंय. माझ्यावर आरोप करताय की पंकजा मुंडेनी जिल्ह्याची बदनामी केली. मी कधी बदनामी सारखे काम केले का? तसे काम केले तर तो माझा शेवटचा श्वास असेल, असा पलटवार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केला.
ना. धनजंय मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या बदनामीला पंकजा यांना जबाबदार धरलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना पंकजा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. बीड येथील शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना पंकजा यांनी आघाडी सरकारवरही चौफेर हल्ला चढवला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, लोक आज माझ्या आणि प्रीतम यांच्या नावाने आपल्या मुलींची नावे ठेवतात. लोक आपल्या मुलांचे नाव ठेवताना आमचा चेहरा समोर आणून ठेवतात. ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आपले सरकार येणारच आहे. लोक घरी आणून मत देतील असे काम विरोधकांनी केले. एवढे वाईट काम या सरकारमधील लोकांनी केले आहे, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. माझ्याकडे कोणतेही फार्म हाऊस नाही. मोठे ऑफिस नाही. राजकारणात ज्यांचा अहंकार जास्त होतो त्याचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.