केज दि. 24 – मुलीला नांदण्यास येण्यासाठी वकीला मार्फत नोटीस का पाठविली म्हणून एकास मारहाण केल्याची घटना घडली आहे.
साळेगाव ता. केज येथील भारत वैरागे यांचा मुलगा विकास याचे लग्न पिसेगाव येथील आश्रूबा लांडगे यांची मुलगी रेश्मा हिच्या सोबत एक वर्षा पूर्वी झाले आहे. परंतु त्याची पत्नी एक वर्षां पासून नांदत नाही. ती पिसेगाव येथे माहेरी असते. तिने नांदायला येण्यासाठी वैरागे यांनी तिला वकीला मार्फत नोटीस पाठविली आहे. परंतु दि. २३ मार्च रोजी सायंकाळी ४:०० वा. च्या सुमारास भारत वैरागे हे केज बस स्टँड जवळील अमन ट्रॅव्हल्सच्या बुकिंग ऑफिस समोर असताना आश्रुबा कोंडीबा लांडगे हा आला व म्हणाला की, मुलीच्या लग्नात मी केलेला खर्च परत कर. असे म्हणुन भारत वैरागे यांच्या गालात चापट मारली व शिवीगाळ करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तेथे बाजुला उभे असलेले अनिल महाजन यांनी भांडण सोडविले.
सदर प्रकरणी भारत वैरागे यांच्या फियादी वरून केज पोलीस ठाण्यात आश्रूबा लांडगे याच्या विरुद्ध भा.दं.वि. ३२३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे करीत आहेत.