नवी दिल्ली दि.२५ – देशातील तमाम शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना चालवली जाते. तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत पुन्हा एकदा मोठा बदल करण्यात आला आहे.
गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने या योजनेची सुरूवात केली. जर शेती पती-पत्नीच्या नावावर असेल, ते एकत्र राहत असतील आणि कुटुंबात अल्पवयीन मुलं असतील तर या योजनेचा लाभ एकाच व्यक्तीला मिळण्याची तरतूद आहे. मात्र, आर्थिक लाभासाठी अनेक जोडप्यांनी खोटी कागदपत्रे दाखवत दोन-दोन हजार रूपयांचे अनेक हफ्ते मिळवले. 11वा हफ्ता मिळण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने कारवाईचा बडगा उचलला आहे. फसवणूक करून लाभ मिळवणाऱ्यांना सरकारने नोटीस पाठवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे पती-पत्नी दोघांनीही या योजनेचा लाभ घेतला असेल तर दोघांपैकी एकाला मिळालेली रक्कम परत करावी लागणार आहे.
दरम्यान, 12 कोटींहूनही अधिक शेतकऱ्यांवर या बदलाचा थेट परिणाम होणार आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत या योजनेत वेगवेगळे आठ बदल करण्यात आले आहेत. ई-केवायसी या महत्वाच्या बदलानंतर सरकारने पती-पत्नीच्या लाभाबाबत हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.