केज दि.१७ – सध्या पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली असतानाच कृषी सेवा केंद्र चालक मात्र लॉकडाऊनच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुटत असून वाढीव दराने खत व बियाणे विकत आहेत. याबाबत प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेकापचे केज तालुका अध्यक्ष प्रविण खोडसे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची मोठी झुंबड उडाली आहे.मात्र मध्येच कोरोनामुळे व लॉकडाऊनच्या नावाखाली वरूनच खत व बियाणे महाग मिळत असल्याचे दुकानदार कांगावा करत आहेत. दरम्यान अनेक कृषी दुकानदार शेतकऱ्यांना लुबाडत असल्याचे या निवेदनात म्हटले असून अशा दुकानदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी प्रविण खोडसे यांच्यासह दत्ता मुजमुले, मनोज चौधरी यांनी केली आहे.