पुणे दि.२ – पीएम किसान योजनेत नियमितता साधण्यासाठी दिवसेंदिवस नवनवीन नियम लागू केले जात आहेत. e-KYC साठी मुदतवाढ करण्यात आली असली तरी आता ज्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड हे बॅंक खात्याशी संलग्न आहे त्याच खात्यावर पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे e-KYC बरोबरच शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड हे बॅंक खात्याशी संलग्न आहे की नाही याची तपासणी करावी लागणार आहे. मात्र, राज्यातील तब्बल 17 लाख 50 हजारहून अधिक शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे खात्याशी संलग्नच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे मदतवाटपात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
पीएम किसान योजनेचे राज्यात 1 कोटी 9 लाख 33 हजार 298 शेतकरी हे योजनेचे लाभार्थी आहेत. असे असतानाच 1 कोटी 6 लाख 53 हजार 329 खातेदारांनी माहिती आधार नोंदणीनुसार प्रमाणित केली आहे. योजनेला तीन वर्ष पूर्ण झाले असतानाही 2 लाख 79 हजार शेतकऱ्यांनी आधार क्रमांकच सादर केला नाही. त्यामुळे दिलेली माहितीमध्ये काही चूक असेल किंवा त्यांची नावे ही प्रमाणित झालेली नाहीत. त्यामुळे 11 व्या हप्त्याचे पैसे खात्यामध्ये जमा होणार की नाही याबाबत साशंका उपस्थित केली जात आहे. 11 वा हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी बॅंकेमध्ये जाऊन आधारची माहिती खात्याशी संलग्न करुन घ्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यांना थेट लाभाचा फायदा होणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी योजनेत नोंदणी करताना आधार क्रमांक दिलेला नाही किंवा आधारमध्ये काही त्रुटी आहेत अशा लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे.
दरम्यान, जानेवारीमध्ये 10 हप्ता जमा झाल्यानंतरच e-KYC हे बंधनकारक राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार होती. एवढेच नाही तर ज्या शेतकऱ्यांनी e-KYC केले नाही अशा शेतकऱ्यांची नावे ग्रामपंचायतीमध्ये प्रसिध्द करण्यात आली आहेत. त्यानुसार आधार कार्ड, बॅंक पासबुक, मोबाईल नं.याची पूर्तता करुन शेतकऱ्यांना e-KYC करता येणार आहे.