केज दि.३ – तालुक्यातीळ होळ ते आडस रस्त्यावर लाडेवडगाव शिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मानवी सांगाडा आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा प्रकार घातपाताचा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि युसुफवडगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांनी भेट दिली.
युसूफवडगाव पोलीस ठाणे हद्दीत आडस-होळ रस्त्यावरील लाडेवडगाव शिवारातील विठ्ठल मारोती मांडे यांच्या सर्व्हे नंबर ३३ मध्ये ढाकण्याचा माळ नावाने ओळखले जात असलेल्या शेतात कापसाच्या पिकात ज्वारीचा कडबा उभा करून ठेवला आहे. रस्त्याच्या पश्चिम दिशेला रस्त्या पासून सुमारे २०० फूट अंतरावर एक अर्धवट जळालेले पुरुष जातीच्या प्रेताचा सांगाडा आढळून आला आहे.
विठ्ठल मारोती मांडे हे दि. ३ एप्रिल रोजी सकाळी ७:०० वा. च्या सुमारास या रस्त्याने होळ येथे डेअरीवर दूध घालण्यासाठी जात असताना त्यांना त्यांच्या शेतातील रचून ठेवलेला कडबा जळाला असल्याचे पाहिले. त्यानी जवळ जाऊन पाहिले असता तेथे अर्धवट जळालेल्या एक मानवी सांगाडा दिसला. हा प्रकार पहाताच त्यांनी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे आणि त्यांचे पथक घटना स्थळावर पोहोचले. त्यांनी पहाणी केली असता तेथे अर्धवट जळाले कपडे व करदोरा या वरून हा मृतदेह पुरुष जातीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या मृत्यूदेहाची अद्याप ओळख पटली नसून सदर प्रकार हा घातपात असावा की अपघात ? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सविता नेरकर आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली आणि तपासा संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांना सूचना दिल्या. तर प्रेताची उत्तरीय तपासणी करण्यासाठी स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद दोडे व डॉ. लक्ष्मी यांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली.