भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. चीनविरोधात भारत आता कठोर आर्थिक निर्णय घेण्याची शक्यता आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. भारत सरकारने देखील त्यासंबंधी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. सरकारने दूरसंचार कंपनी बीएसएनलला चिनी उपकरणांचा वापर कमी करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच दूरसंचार मंत्रालयाने खासगी कंपन्यांना नव्याने विचार करुन याबाबत ठाम निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. खासगी मोबाईल सेवा ऑपरेटर्सने देखील तात्काळ चिनी कंपन्यांच्या उत्पादनांची उपयुक्तता कमी करावी, यावर दूरसंचार विभाग काम करत आहे.
त्याचबरोबर व्यापारी संघटनेने चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी आणि भारतीय वस्तूंना प्रोत्साहन देणारा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार चिनी कंपन्यांच्या गुंतवणुकीचे करार रद्द करण्याची शक्यता आहे. यामध्ये दिल्ली-मेरठ रॅपिड रेल्वे प्रोजेक्टचादेखील समावेश आहे.