केज दि.१२ – तालुक्यातील सोनेसंगवी सुर्डी येथे एका मागासवर्गीय समाजाच्या महिलेचा अंत्यविधी काही लोकानी रोखला. त्या नंतर महसूल आणि पोलीस प्रशासनाने तडजोड घडवून अंत्यसंस्कार केले.
सोनेसांगवी येथील नंदूबाई नामदेव थोरात वय ५० वर्ष या मागासवर्गीय समाजातील महिलेचे दि. ११ एप्रिल सोमवार रोजी निधन झाले. मात्र गावाच्या पूर्व दिशेले असलेल्या खळवट नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात अंत्यसंस्कार करण्यासाठी तेथे शेजारी असलेल्या काही शेतकरी महिला व त्यांच्या नातेवाईकांनी जमा होऊन विरोध केला. त्यामुळे त्या महिलेचा अंत्यसंस्कार रखडला होता. सदरील माहिती तहसील आणि युसूफवडगाव पोलीस प्रशासनाला मिळताच मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी मध्यस्थी केली. त्या नंतर त्या प्रेतावर अंत्यसंकार करण्यात आले. मात्र पुन्हा एकदा तालुक्यातील मागासवर्गीय समाजातील स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या पूर्वी दि. ४ जानेवारी रोजी लक्ष्मीबाई शहाजी कसबे या ६५ वर्षीय मागासवर्गीय समाजातील महिलेचे निधन झाले होते. तिचा अंत्यविधीही काही लोकांनी रोखल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी दि. ५ जानेवारी लक्ष्मीबाई कसबे हिचा मृतदेह ट्रॅक्टर मधून आणून केज तहसीलच्या आवारात ठेवला होता. त्या नंतर तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी सामाजिक कार्यकर्ते रमेश भिसे, रिपाइंचे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, रवींद्र जोगदंड, राष्ट्रवादीचे मुकुंद कणसे, सरपंच विजयकुमार इखे यांच्यासह ग्रामस्थ व मयताच्या नातेवाईकांशी चर्चा केली अंत्यविधी केला होता.