Site icon सक्रिय न्यूज

महिला पोलिसाचे २ लाख १० हजारांचे दागिने लंपास……!

महिला पोलिसाचे २ लाख १० हजारांचे दागिने लंपास……!
केज दि.१२ – एका कारागृह महिला पोलीस कर्मचाऱ्याचे बसमध्ये ठेवलेल्या बॅगेतील पर्समधून २ लाख १० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मस्साजोग ( ता. केज ) येथे घडली असून नाश्त्यासाठी उतरल्यावर चोरट्याने पाळत ठेवून डल्ला मारला. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
      केज तालुक्यातील केकाणवाडी येथील रहिवासी असलेल्या संगीता कुंडलिक केकाण ( वय ३० ) या अकोला येथील कारागृहात पोलीस पदावर नोकरीस आहेत. सध्या त्या खीळद ( ता. आष्टी जि. बीड ) येथे वास्तव्यास असून त्यांचे पती अहमदनगर येथे पोलीस सेवेत आहेत. संगीता केकाण ह्या सध्या दोन महिन्याच्या बालसंगोपन रजेवर आहेत. खीळद येथून केकाणवाडीकडे जाण्यासाठी ११ एप्रिल रोजी सकाळी कडा येथे आल्या. सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास कडा येथून पुणे ते गंगाखेड या बसमध्ये बसून त्या प्रवास करीत होत्या. दुपारी १२.३० ते १२.४५ वाजेच्या दरम्यान बस ही मस्साजोग येथे आल्यानंतर नाश्त्यासाठी थांबली. त्यांनी बसमधून उतरताना जवळील पर्समध्ये दागिने, एटीएम कार्ड ठेवून बॅगमध्ये पर्स ठेवली. नाश्ता करून पुन्हा बसमध्ये येऊन बसल्या. त्यानंतर गावी आल्यावर त्यांनी बॅगमधील पर्स उघडून बघितली असता पर्समधील ३० हजार रुपयांचे सोन्याचे नेकलेस, ५५ हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, ८३ हजार रुपयांचे सोन्याचे दोन लॉकेट, ३० हजार रुपयांचे कानातील सोन्याचे झुंबर, १५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, तीन हजार रुपयांच्या सोन्याच्या टॉप्स व नऊ हजाराचे चांदीचे दागिने असा २ लाख १० हजार रुपयांचे दागिने लंपास झाल्याचे निदर्शनास आले. नाश्त्यासाठी बसमधून उतरताना चोरट्याने पाळत ठेवून हा डल्ला मारला.
           दरम्यान, संगीता केकाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक दिलीप गित्ते हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version