मुंबई दि.१३ – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे वृत्त समजत आहे. मुंडे यांना तातडीने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुंडे काल परभणीला गेले होते. त्यानंतर आज त्यांचा जनता दरबार होता.
मंत्री धनंजय मुंडे याना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे वृत्त समजताच आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील रुग्णालयात तातडीने पोहचले आणि मुंडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली, धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माहिती देताना सांगितले. त्यांच्या सर्व आवश्यक तपासण्या झाल्या असून सर्वकाही ठीक आहे, कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
दरम्यान सध्या तरी मुंडेंना काही धोका नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. पुढील तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचेही टोपेंनी सांगितले.