Site icon सक्रिय न्यूज

नेहरकर खून प्रकरणातील तीन आरोपी पुणे जिल्ह्यातून जेरबंद…..!  

नेहरकर खून प्रकरणातील तीन आरोपी पुणे जिल्ह्यातून जेरबंद…..!  
केज दि.१४ – मुलीसोबत लग्न लावून देण्यास नकार दिल्यावरून एका तरुणाने आपल्या दोन साथीदारांसह मुलीच्या पित्यावर हल्ला करीत खून केला. फरार असलेल्या आरोपींचा मोबाईलच्या लोकेशनवरून शोध काढून वाघोली ( जि. पुणे ) येथून अटक करीत हजर केले.
         केज तालुक्यातील तांबवा येथील भागवत संदीपान चाटे या तरुणाने मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी पिसेगाव ( ता. केज ) येथील रमेश एकनाथ नेहरकर ( वय ४२ ) हे आपल्या पत्नीसह चाटे याच्याकडे ८ एप्रिल रोजी गेले होते. तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न लावून द्या नसता ठार मारून टाकीन अशी धमकी भागवत चाटे देत ९ एप्रिल दुपारी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग करीत केज – कळंब रस्त्यावरील गांजी पाटीजवळ लोखंडी रॉडने हल्ला करीत भागवत चाटे व त्याचे दोन साथीदार पसार झाले होते. लातूरच्या अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना रमेश एकनाथ नेहरकर यांचा ११ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह केजच्या पोलीस ठाण्यात आणून ठिय्या मांडला होता. अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी तपासाबाबत सूचना करीत आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी आरोपींच्या शोधासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे व फौजदार राजेश पाटील यांची दोन पथके पाठविली होती. शेवटी  आरोपींच्या मोबाईलचे टॉवर लोकेशनवरून  आरोपी हे केजवरून पुणे, झाशी ( उत्तर प्रदेश ) येथे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस नाईक दिलीप गित्ते, अशोक मंदे यांचे पथक झाशीकडे जाणार तोच आरोपी हे पुन्हा परत येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पथकाने वाघोली ( जि. पुणे ) येथुन मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली.
                  दरम्यान, अटक करण्यात आलेल्या भागवत संदीपान चाटे, शिवशंकर हरिभाऊ इंगळे ( वय २८, रा. इंगळे वस्ती, केज ), रामेश्वर नारायण लंगे ( वय २९, रा. जहागिर मोहा ता. धारूर ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
शेअर करा
Exit mobile version