केज दि.१६ – येथील उपजिल्हा रुग्णालयात आझादीचा अमृत महोत्सव अंतर्गत आरोग्य शिबिराचे मंगळवार दिनांक १९ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात विविध आजाराची तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तरी शिबिराचा लाभ तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजय राऊत,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी केले आहे.
केज येथील उपजिल्हा रुग्णालयात आझादीचा अमृत महोत्सव अंतगत दिनांक १९ एप्रिल रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उदघाटन आ. नमिता मुंदडा यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी खा. रजनी पाटील,खा.डॉ. प्रितम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. आरोग्य शिबिरात अंड वृद्धी (हायड्रोसिल ),हर्निया ,अपेंडिक्स ,लहान मुलांमधील टंग -टाय (जिभेवरील शस्त्रक्रिया )शरीरावरील सर्व प्रकारच्या गाठीच्या शस्रक्रिया ,दंत चिकित्सा ,आदी आजारावरील शस्त्रक्रीया व औषधोपचार मोफत करण्यात येणार आहेत. तसेच गर्भाशय व स्थनाच्या गाठी,रक्तदाब, मधुमेह ,असांसर्गिक आजार ,इसीजी,एक्सरे ,सोनोग्राफी ,रक्त व लघवी तपासणी करण्यात येणार आहेत.
या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ, शस्रक्रिया तज्ञ ,दंतरोग तज्ञ ,बालरोग तज्ञ ,कान नाक घसा तज्ञ ,आयुर्वेद तज्ञ ,जनरल फिजिशियन या शिबिरात रुग्णाची मोफत तपासणी व शस्त्रक्रीया ,औषधोपचार करणार आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी केले आहे.