मुंबई दि.२१ – पाच कोटी रूपये द्या नाहीतर तुमच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल करेन, अशी धमकी एका महिलेने राष्ट्रवादीचे नेेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दिली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात या महिलेविरूद्ध तक्रार दाखल केली होती.
धनंजय मुंडेंनी तक्रार दाखल केल्यानंतर काही तासांतच मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने रेणू शर्मा या महिलेला ताब्यात घेतलं आहे. मुंबई क्राईम ब्रांच व इंदूर पोलिसांनी एकत्र कारवाई करत मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेला मध्य प्रदेशातील इंदूरमधून अटक केली आहे. रेणू शर्मा या महिलेने जानेवारी महिन्यात देखील धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवारा पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी ती तक्रार मागे देखील घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा धनंजय मुंडेंकडे 5 कोटींची व महागड्या मोबाईलची देखील मागणी केली. मला पैसे दिले नाही तर तुमच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करेन व सोशल मीडियावर बदनामी करेन, अशी धमकी दिल्याची तक्रार मुंडेंनी केली होती.
दरम्यान, रेणू शर्मा या सामाजिक कार्यकर्त्या करूणा शर्मा यांची बहिण असून एक गायिका आहेत. रेणू शर्माच धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानूसार पोलिसांनी रेणू शर्माला अटक केली आहे.