Site icon सक्रिय न्यूज

मुलींनो आत्मनिर्भर व्हा – कवीता नेरकर……!

मुलींनो आत्मनिर्भर व्हा – कवीता नेरकर……!
अंबाजोगाई दि.२ – मुलींनो आत्मनिर्भर व्हा.अन्यायाविरुद्ध बंड करा. उच्च शिक्षण घेऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हा .असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी शाळा-महाविद्यालयीन युवतींना केले. अंबाजोगाई येथील योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी आणि श्रीमती कमल खुरसाळे स्मृती न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या आठ दिवसीय  तेराव्या महिला आत्मभान प्रशिक्षण शिबिरात त्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
                 तेराव्या महिला आत्मभान प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन रविवारी १ मे महाराष्ट्र दिनी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या हस्ते व योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे, आंतरराष्ट्रीय खो – खो  खेळाडू निकिता पवार  सेवा निवृत्त मुख्याध्यापिका वर्षा जालनेकर, मुख्याध्यापिका मीना कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गोदावरीबाई कुंकूलोळ  योगेश्वरी कन्या शाळेच्या प्रांगणात असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, भाऊसाहेब चौसाळकर, महात्मा  फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.
डॉ. सुरेश खुरसाळे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. दरम्यान योगेश्वरी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. माणिकराव लोमटे, उपाध्यक्ष ॲड.शिवाजीराव कराड,सहसचिव  साहेबराव गाठाळ, ज्येष्ठ पत्रकार प्रा. नानासाहेब गाठाळ यांची यावेळी  उपस्थिती होती.
                   अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी आयोजित प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या उपस्थित विद्यार्थिनींना विविध प्रश्नांवर संवाद साधला. गुड टच,बॅड टच यातील फरक मुलींना ओळखता आला पाहिजे.आपण असुरक्षित आहोत असे वाटल्यास समोरच्या व्यक्तीला प्रखर प्रतिकार केला पाहिजे.त्या क्षणी मोठ्या आवाजात नाही ,नको म्हटले पाहिजे. जेणेकरून समोरच्या व्यक्तीवर मानसिक परिणाम होईल व आजूबाजूला असलेल्या व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येतील. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा लागतो. मुलींनी विचाराने व अनुभवाने समृद्ध व्हायला हवे. निरोगी आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य देखील उत्तम असले पाहिजे. सकस आहार घ्या. संगत चांगल्या व्यक्तींची ठेवा. चांगली संगत असल्यास वैचारिक पातळी वाढते. बालविवाहास विरोध करा. ज्याप्रमाणे मुलींसाठी प्रशिक्षणे आयोजित केली जातात त्याच प्रमाणे मुलांनासुद्धा प्रशिक्षण दिले पाहिजे असे मत अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी आपल्या भाषणांमधून व्यक्त केले.
सातत्यता ठेवल्यास आयुष्यात यश हमखास मिळते .मला आतापर्यंत २२ सुवर्ण व रौप्य पदके मिळाली आहेत. मुलींनी आनंदाने जीवन जगले पाहिजे. असे निकिता पवार यांनी मुलींना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सेवा निवृत्त मुख्याध्यापिका वर्षा जालनेकर यांनी दररोज व्यायाम आणि योगासने करा. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम राहा. मैदानी खेळ भरपूर खेळा व आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव द्या असे आवाहन केले.
शिबिराचा अध्यक्षीय समारोप करत असतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी खऱ्या अर्थाने महिलांना प्रत्यक्षात स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संविधानाचा फार मोठा वाटा आहे. संविधानाची अंमलबजावणी प्रत्यक्षरित्या व्हायला हवी, तेव्हा खऱ्या अर्थाने महिलांना स्वातंत्र्य मिळेल. दर्जा आणि संधीची समानता असायला हवी. यासाठीचा प्रयत्न योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. त्याचप्रमाणे मी सक्षम आहे, निर्भर आहे, अन्याय सहन करणार नाही, असा संस्कार मुलींमध्ये रुजविण्याचा प्रयत्न  शिबिरांमधून केला जात आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवकुमार निर्मळे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती एस. एस. देशमुख यांनी केले. उपमुख्याध्यापिका मंगला लोखंडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सहशिक्षिका अंजली रेवडकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या सर्व शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य पदाधिकारी, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी शिबिरातील विद्यार्थिनी, एनसीसी छात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
● एनसीसी छात्र बाजीराव गायकवाड, शुभम कातकडे, रोहन कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, हनुमंत घोळवे व सेवक राहुल घाडगे यांनी  ११० खड्डे खोदून वृक्षारोपणासाठी  पुढाकार घेतला म्हणून मान्यवरांच्या हस्ते सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शेअर करा
Exit mobile version