केज दि.4 – खर्चासाठी – पैसे न दिल्याच्या रागातून पोराने आईच्या मदतीने बापाला लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना दहा दिवसापूर्वी केज तालुक्यातील बेंगळवाडी येथे घडली होती. मारहाणीत जबर जखमी झालेल्या बापाचा रविवारी (दि. ०२) रात्री पुण्यात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. याप्रकरणी माय – लेकावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रमेश सोनाजी शिंदे (वय ३८, रा. बेंगळवाडी, ता. केज) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. रमेशचा भाऊ बाबुराव यांच्या फिर्यादीनुसार, रमेश आणि त्याची पत्नी हिराबाई, मुलगा ऋषिकेश यांच्या पैशावरून नेहमी वाद होत असे. यातून अनेकदा त्या दोघांनी रमेशला मारहाण केलेली आहे. दि. २३ एप्रिल रोजी दुपारी ४ वा. त्यांच्यात पैशावरून पुन्हा जोरदार वाद झाला. हिराबाई आणि ऋषिकेश रमेशकडे खर्चासाठी पैसे मागत होते, मात्र पैसे
नसल्याने रमेशने त्यांना नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या ऋषिकेशने घराच्या अंगणात पडलेला लोखंडी दांडा उचलला आणि वडिलांच्या डोक्यात मारला. डोके फुटून रमेश जबर जखमी झाल्यानंतरही ऋषिकेशने मारहाण चालूच ठेवली. यावेळी बाजूला उभी असलेली हिराबाई देखील त्याला आणखी मारण्यासाठी चिथावणी देत होती. रमेशचा आरडाओरडा ऐकून नातेवाईक आणि ग्रामस्थ जमा झाले त्याला उपचारासाठी नेकनूर आणि नंतर बीडच्या शासकीय रुग्णालयात घेऊन गेले.
दरम्यान, प्रकृती नाजूक झाल्याने रमेशला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले. तिथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना रमेशचा रविवारी दुपारी ४ वा. मृत्यू झाला. सदर फिर्यादीवरून हिराबाई आणि ऋषिकेश या दोघांवर केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर सदरील घटनेचा तपास पोलीस करत असून नेमकी घटना कोणत्या कारणातून घडली याचा शोध घेत आहेत. तापसांती नेमके कारण स्पष्ट होईल.