कोरोना संपला असं वाटत असतानाच कोरोना व्हायरसने देशातील अनेक भागात पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत दिले आहेत.जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे.
राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात असली तरी कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका मात्र कायम आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.जून, जुलै महिन्यात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते, असं मोठं वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं आहे. लसीकरणाचं प्रमाण वाढवणं हेच राज्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं देखील राजेश टोपे म्हणाले आहेत.
दरम्यान, जून, जुलैमध्ये येणारी कोरोनाची चौथी लाट जास्त जीवघेणी ठरतीये असं वाटलं तर फक्त लसीकरणच तारणहार असणार आहे. त्यामुळे लसीकरणाचं प्रमाण वाढवणं सध्या महत्त्वाचं आहे. आरोग्य विभाग याबाबत अत्यंत सजग आणि जागरूक राहून लसीकरणाचं काम करत आहे, अशी महत्त्वाची माहिती राजेश टोपेंनी दिली आहे.