मुंबई दि.१७ – बारावीला आता आपल्या पसंतीचं कॉलेज घ्यायचं असेल तर त्यासाठी आता शिक्षण उपसंचालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळं बारावीला हवं ते कॉलेज आता विद्यार्थ्यांना थोडं अडचणीचं ठरणार आहे.
दहावी नंतर कुठल्याही कॉलेजला प्रवेश घेताना तो प्रवेश दहावीच्या मार्कांवर अवलंबून असायचा त्यामुळे विद्यार्थ्यांना बरेचदा हवं ते कॉलेज मिळत नसायचं. 11वी मिळालेल्या कॉलेजात काढायची आणि बारावीला हव्या असलेल्या कॉलेजात डोनेशन भरून प्रवेश घ्यायचा अशी पद्धत रीतसर सुरु असायची. या सगळ्याला आळा घालण्यासाठी आता बारावीत कॉलेज बदलून घेण्यासाठी शिक्षण उपसंचालकांची परवानगी घेण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. याशिवाय आता बारावीला (12th) कॉलेज बदलताना कारण सुद्धा रास्त लागणार आहे. ठराविक कारणांसाठीच कॉलेज बदलायची मुभा आता मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अडचण असल्यास जे कॉलेज हवं असेल त्या कॉलेजकडून ना हरकत प्रमाणपत्र तसंच कॉलेज बदलासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाची मान्यता आणि नेमकं कारण (रास्त कारण) असेल तरच विद्यार्थ्याला कॉलेज बदलायची परवानगी मिळणार आहे. बारावी प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाला पाठवणं आवश्यक आहे.
दरम्यान, सध्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेलं कॉलेज घरापासून लांब असणं, पालकांची बदली होणे, वैद्यकीय कारणास्तव परिसरातलं कॉलेज मिळणे, शाखा बदलून मिळणे, विद्यर्थ्यांचा राहण्याचा पत्ता बदलणे, बारावीमध्ये विद्यार्थ्याला बोर्ड बदलून घ्यायचा असेल तर अशा कारणांसाठी पूर्वी बारावीमध्ये कॉलेज बदलून मिळत असे. पण बारावीला कॉलेज बदलून घेण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे त्यामुळे आता ही कारणं पडताळून घेऊनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.