केज दि.२२ – गावातच नातेवाईकांच्या लग्नासाठी सासू व सून घाईगडबडीत घर उघडे ठेवून गेल्या. पाठीमागे घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील नगदी ८० हजार रुपये व सहा ग्रॅमचे कानातील सोन्याचे झुंबर असा ९२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना सनगाव ( ता. अंबाजोगाई ) येथे घडली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सनगाव ( ता. अंबाजोगाई ) येथील ट्रॅक्टर चालक ज्योतिराम नवनाथ अंजाण यांनी मुलाच्या दवाखान्याच्या खर्चासाठी ८० हजार रुपयांची बीसी उचलून ती रक्कम आणून कपाटात एका डब्यात ठेवली होती. त्या डब्यात पत्नीच्या कानातील सहा ग्रॅमचे सोन्याचे झुंबर ही ठेवले होते. २१ मे रोजी ज्योतिराम अंजाण हे ट्रॅक्टरवर गेले होते. तर त्यांची पत्नी व आई या दोघी सासू व सून हे गावात नातेवाईकांचे लग्न सोहळा असल्याने दुपारी घाईगडबडीत घर उघडे ठेवून लग्नास गेल्या. घर उघडे आणि घरात कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरटे घरात घुसले. त्यांनी घराची झडती घेत कपाट उघडून बघितले. त्यात असलेला डबा उघडून डब्यात असलेले ८० हजार रुपयांची रोकड व सहा ग्रॅमचे कानातील सोन्याचे झुंबर असा ९२ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. ज्योतिराम अंजाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार तुपारे हे करीत आहेत.