केज दि.२३ – केज बीड रोडवर जॅक टाकून एका चार चालकाला लुटल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एक ट्रक त्याच पद्धतीने लुटल्याची घटना समोर आल्याने हा नवीन फंडा वाहनचालकांना अडचणींचा ठरत आहे.
मागच्या कांही वर्षांपूर्वी मस्साजोग ते बरड दरम्यान मध्यरात्री रोडवर मातीचे गतिरोधक तयात करून वाहनांची गती कमी झाली की गाडीतील माल लुटल्याच्या कित्येक घटना घडलेल्या आहेत. परंतु नंतर रस्त्याचे काम झाल्याने व वाहनांची वर्दळ वाढल्याने सदर प्रकार थोडेसे कमी झाले होते. परंतु पुन्हा चोरट्यानी डोके वर काढले असून प्रलोभने दाखवत लुटण्याचा नवीन प्रकार सुरू केला आहे. मागच्याच महिन्यात एका कार चालकाला एक जॅक रोडवर पडलेला दिसला. आणि तो उचलण्यासाठी चालकाने गाडी थांबवली असता बाजूलाच दबा धरून बसलेल्या चोरांनी त्यांना लुटले होते. नेमका तसाच प्रकार रात्री झाला असून ट्रक मधील दोघांना अगदी त्याच प्रमाणे लुटले आहे.
अहमदपूर तालुक्यातील नांदूर येथील ट्रक चालक गोविंद निवृत्ती कुंटे व महेश मालवाड हे दोघे नाशिक वरून ट्रक आणण्यासाठी निघाले होते.दरम्यान सदरील ट्रक दि.२३ मे रोजी पहाटे १.३० ते २ च्या दरम्यान केज बीड रोडवरील मस्साजोग येथील देशमुख पेट्रोल पंपा पासून अर्धा किमी वर गेली असता चालकाला एक जॅक दिसला. जॅक दिसल्याने तो घ्यावा म्हणून चालकाने ट्रक बाजूला घेऊन खाली उतरला असता २५ ते ३० वयोगटातील दोन तरुणांनी झडप घालून चालका बरोबर झटापट करून लाकडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच चाकूचा धाक दाखवला असता चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता चाकू हाताला लागला. चोरट्यांचा तावडीतून ट्रक चालक पळाला असता त्याचे सोबत असलेल्या महेश याने ट्रक पुढे नेला व चालकाला बसवले. मात्र चोरांनी दोन मोबाईल सह सुमारे १२५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाल्याची घटना घडली.
सदर घटना घडल्या नंतर ट्रक चालक गोविंद कुंटे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीसांत दोघा अज्ञातां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे करत आहेत.