Site icon सक्रिय न्यूज

विधवा………!

“विधवा”
——————————————–
रुक्मिणी नागापूरे
 एकल महिला संघटना बीड
——————————————
23 जून आज जागतिक विधवा महिला दिवस!!
      23 जून 2011 पासून संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस जागतिक विधवा महिला दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. मनात प्रश्न निर्माण झाला की, 8 मार्च जागतिक महिला दिन असताना हा विधवा महिला दिवस साजरा करण्याची काय आवश्यकता ? विधवा ही काय महिला नाही का? तसे पाहता भारताचा नव्हे तर जगाचा प्रदेश बदलला किंवा भाषा बदलली, संस्कृती धर्म आचार-विचार बदलताना आपल्याला पाहावयास मिळतात.आपण भारताचा विचार केला तर आपल्याला भारतातही अनेक संस्कृतिचे भाषेचे धर्माचे लोक राहताना दिसतात. या सर्वांचा मुख्य आधारस्तंभ हा कुटुंब संस्था आहे. आपल्याला प्रत्येक धर्मात पाहायला मिळते आणि या कुटुंब व्यवस्थेचा मुख्य आधार ही महिला आहे.महात्मा ज्योतिराव फुले यांनी एका ठिकाणी खूप सुंदर वाक्य लिहिले आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी…… मग आपल्याला जगाचा उद्धार करायचा असेल तर महिला म्हणून समाजात स्त्रीला काय स्थान आहे याचेही आपण परीक्षण केले पाहिजे.
           भारत देशाचा विचार करता भारताला खूप मोठा इतिहास आहे. याचा अभ्यास करत असताना आपल्या हे लक्षात येते की, पूर्वी भारतात वर्णव्यवस्था होती. ब्राह्मण  क्षत्रिय, आर्य आणि वैश्य ही व्यवस्था उतरंडी प्रमाणे होती. प्रत्येक वर्णाचे अधिकार उतरत्या क्रमाने गोठवण्यात आले होते.अर्थात चौथ्या वर्णाला म्हणजे क्षुद्रला कवडीमोल किंमत होती. भारताचा अभ्यास केला असता आपल्या हे ही लक्षात येते की, या चार वर्णा व्यतिरिक्त आणखी एक वर्ण येतो, तो महिला ! कारण या पाचव्या वर्णातील महिलेचेही ही सर्व अधिकार नष्ट करण्यात आले होते. हे आपणास दिसतात मग पाचवा वर्ग निर्माण होतो तो “भारतीय महिला”. अनेक जाती प्रमाणे महिला या पाचव्या वर्णातही ही गट पडलेले आपणास दिसून येतात.
 तसे पाहता स्त्री जन्माला येते आणि पूर्ण आयुष्य पुरुषाच्या अधिपत्याखालीच जीवन जगते. तिला स्वतःचे असे काही स्वातंत्र्य असल्याचे आपणास दिसत नाही. लहानपणी पिता, तारुण्यात पती  आणि वृद्धापकाळात मुलगा तिच्यावर अधिकार गाजवताना आजही आपण पाहतो. त्यातही जर तिला तारुण्यात वैधव्य आले तर तिच्या संकटांना परिसीमा उरत नाही. समाजापासून तिला विभक्त केले जाते, तिच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोण बदलतो आणि याच पार्श्वभूमीवर 23 जून 2011 पासून संयुक्त राष्ट्र संघाने विधवांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा दिवस निश्चित करून या दिवसाची जागतिक विधवा महिला दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून संपूर्ण जगातील विविध समाजातील प्रत्येक विधवेचे आयुष्य नेहमीप्रमाणे व्यतीत होऊ शकेल. बिंदेश्वर पाठक (सुलभ इंटरनेशनल संस्थापक) यांनीही भारतीय विधवांच्या संरक्षणासाठी विधेयक तयार केले होते विधवा वरील अन्याय आणि अत्याचार हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, जे कोणत्याही देशाच्या विकासासाठी सर्वात मोठी समस्या आहे.
            अशा महिलांचे जीवनमान सुधारण्याचे आणि त्यांना सामाजिक मुख्य प्रवाहात जोडण्याच्या उद्देशाने दारिद्र्य हिंसाचार, आरोग्य, बहिष्कार, शोषण आणि इतर अनेक समस्या पासून ग्रस्त असलेल्या जगभरातील विविध वयोगटातील प्रदेश आणि संस्कृतीच्या विधवा प्रथमच 23 जून 2011 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय विधवा दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. त्यानंतर हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो गेल्या सात वर्षापासून ब्रिटनच्या लुंबा  फाउंडेशनने (संस्था) वर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आणि त्यांच्यावर होणाऱ्या विविध समस्या विरुद्ध मोहीम राबवली होती ज्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने विधान वर होणाऱ्या आकडेवारीचा आधार बनला व आंतरराष्ट्रीय विधवा दिन जाहीर केला. असा अंदाज आहे की 115 दशलक्ष विधवा गरिबीत राहतात तर 180 दशलक्ष महिलांचे शारीरिक शोषण होते, पैकी 40 दशलक्ष महिला या भारतात राहतात. वरील आकडेवारी वरून आपल्याही लक्षात येते की चित्र खूप विदारक आहे आज आपण समाजात वावरत असताना पाहतो विधवा स्त्रीला लग्नकार्याततच नाहीतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात अपशकूनी म्हणून हेटाळणी केली जाते. स्वतःच्या कुटुंबाकडून साधी सहानुभूती सुद्धा मिळत नाही, शासन अशा महिलांना प्रति उदासीन दिसते. तिची अवस्था “बाप भीक मागू देत नाही आणि आई आई खायला देत नाही” अशी होऊन बसते तेव्हा समाजाची ही जिमेदरी आहे की, काही जुन्या रूढी आणि परंपराना तिलांजली देणे, या महिला समाजाचा एक अविभाज्य भाग आहेत या दृष्टीने पाहणे, कारण शरीराच्या एका अवयवांना कँसर झाला तर पूर्ण शरीर नष्ट होऊ शकते, तसेच महिला ही या समाजाची एक महत्वाची घटक आहे. तिला या समाजातून दूर लोटले तर समाजाचा, देशाचा विकास खुंटतो. परिणामी त्या देशाची अधुगती होईल. कायदेशीर हक्क आणि अधिकार देणे. महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत महिलांना पुरेसे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत, ते शासनाने प्रमाणिकपणे अशा महिलांना दिले तरी भारतीय विधवा महिलांचे प्रश्न सुटतील.
               अशाच प्रकारे मराठवाडा विभागात एकल महिला संघटना ही अशा महिलांच्या प्रश्नावर कार्य करते. विधवांचे पुनर्विवाह, त्यांच्या प्रॉपर्टीचे प्रश्न रोजगाराचा प्रश्न,महिलांचे आरोग्य व शिक्षणाचे प्रश्न यावर ही संघटना कार्य करते, पण समाजाचा एक भाग म्हणून प्रत्येक भारतीय व्यक्तीने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तो सोडवण्यासाठी आपले योगदान द्यावे अशी अपेक्षा करणे गैर नाही.
शेअर करा
Exit mobile version