Site icon सक्रिय न्यूज

केजच्या कृषी कार्यालयाचा ”स्पॉट पंचनामा”, धक्कादायक माहिती उघड…..!

केजच्या कृषी कार्यालयाचा ”स्पॉट पंचनामा”, धक्कादायक माहिती उघड…..!
केज दि.२७ – पावसाळा तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.पेरणीसाठी खते आणि बियाणांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारत आहेत. तर शेतीसाठी विविध योजनांची माहिती घेण्यासाठी कृषी कार्यालयाचे खेटे घालत आहेत.परंतु गलेलठ्ठ पगार उचलून ढेकर देणारे कृषी कार्यालयाचे कर्मचारी चार चार चकरा मारूनही कार्यालयात भेटत नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी तक्रार केली असता तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
        केजच्या कृषी कार्यालयाच्या अस्थापणेत एकूण सहा कर्मचारी आहेत. मात्र एखाददुसरा कर्मचारी वगळता अन्य कर्मचारी कार्यालयात भेटत नसल्याचे निदर्शनास आले.सदर प्रकरणी चौकशी करण्यासाठी तहसीलदार श्री.मेंडके यांनी मंडलाधिकारी भागवत पवार यांना आदेश दिले होते. सदर आदेशानुसार पवार यांनी दि.२६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता कार्यालयात जाऊन पाहणी केली असता सहा पैकी केवळ एक कर्मचारी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. आता त्या कर्मचाऱ्यांवर तहसीलदार मेंडके काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
         तर सदर कार्यालयाचा पंचनामा करण्यात आला असून सदरील अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मेंडके यांनी दिली. तसेच कोणतेही काम कर्मचारी वेळेवर करत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थीक अडवणूक व पिळवणूक करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांची तक्रार कृषीमंत्री ना.दादा भुसे यांच्याकडे करणार असून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचा इशारा महेशकुमार जगताप (राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय जनकल्याण सेवा संस्था/ अन्याय अत्याचार व भष्ट्राचार विरोधी प्रसार महाराष्ट्र राज्य) यांनी दिला आहे.
             दरम्यान तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत देशमाने यांचेकडे सदर प्रकाराबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. जे कांही कर्मचारी आहेत त्यांनाही फिल्डवर्क असल्याने अनेक अडचणी येत आहेत. आमच्याकडे दोन शिपाई वगळता केवळ चार कर्मचारी आहेत. त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा अपघात झाल्याने ते रजेवर आहेत. तर अन्य दोघे कार्यालयीन कामासाठी बाहेर गेले होते. तर कस्पटे नामक कर्मचाऱ्याचा गैरहजेरीचा अहवाल घेऊन त्यांच्याकडील पदभार काढून इतर एका कडे देऊन शेतकऱ्यांची कामे सोमवारपासून सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शेअर करा
Exit mobile version