केज दि.३० – पेरणीसाठी पैसे नसल्याच्या कारणावरून एका ३० वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील डोका येथे रविवारी दुपारी उघडकीस आली.
डोका येथील अल्पभूधारक शेतकरी सतीश दशरथ भांगे ( वय ३० ) यांनी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी जवळ पैसे नसल्याने टोकाची भूमिका घेत रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक अशोक गवळी, राजू गुंजाळ यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले. याप्रकरणी केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक राजू गुंजाळ हे पुढील तपास करत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व तीन मुली असा परिवार आहे.