Site icon सक्रिय न्यूज

शेतीच्या बांधावरून पंधरा वर्षीय मुलास कोयत्याने मारहाण तर शिंदीत घरफोडी……! 

शेतीच्या बांधावरून पंधरा वर्षीय मुलास कोयत्याने मारहाण तर शिंदीत घरफोडी……! 
केज दि.१ – शेतीचा बांध का फोडला अशी भांडणाची कुरापत काढून एका १५ मुलास कोयत्याने व काठीने मारहाण करीत जखमी केल्याची घटना नारेवाडी ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी चौघांवर केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
        नारेवाडी येथील सुरेश बाबु चौरे ( वय १५ ) या विद्यार्थ्यास तुम्ही आमचा शेताचा बांध का फोडला अशी भांडणाची कुरापत काढून गावातील राहुल बापु चौरे, अनंत बापु चौरे या दोघांनी त्याच्या अवघड जागेवर लाथाबुक्याने मारहाण केली. तर उजव्या हातावर कोयत्याने मारून जखमी केले. बापु वेदराव चौरे, अरुणा बापु चौरे या दोघांनी त्यास लाथाबुक्याने व काठीने मारहाण करीत जखमी केले. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी ही दिली. अशी फिर्याद सुरेश चौरे याने दिल्यावरून बापु चौरे, राहुल चौरे, अनंत चौरे, अरुणा चौरे या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार अशोक मेसे हे करीत आहेत.

 शिंदी येथे घरफोडीत दागिने व ५२ हजाराची रक्कम लंपास 

 केज दि.१ -दरवाजा उघडून घरासमोरून बाथरूममधून बाहेर येईपर्यंत घरात घुसलेल्या दोघा चोरट्यांनी घराची झडती घेत डब्यात ठेवलेले एक तोळ्याचे दागिने व बॅगमध्ये ठेवलेली ५२ हजार रुपयांची रक्कम घेऊन पलायन केल्याची घटना शिंदी ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
        शिंदी येथील प्रभाकर दादासाहेब जाधव यांनी मागील तीन दिवसांपूर्वी सोयाबीन विक्री करून आणलेले ५२ हजार रुपये घरात एका बॅगमध्ये ठेवले होते. तर अगोदरच पत्नीच्या कानातील ५ ग्रॅमचे सोन्याचे झुंबर व ५ ग्रॅमचे ठुशी हे छोट्या डब्यात ठेवून तो डबा डाळीच्या डब्यात ठेवला होता. ३१ मे रोजी रात्री प्रभाकर जाधव हे शेतात झोपण्यासाठी गेले होते. तर घरी त्यांची पत्नी, मुलगा व त्यांची नात झोपली होती. १ जून रोजी पहाटे २.३० ते २.४५ वाजेच्या दरम्यान त्यांची पत्नी दरवाजा उघडून घरासमोरील बाथरूममध्ये गेल्या. दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरटे घरात घुसले. त्या परत येईपर्यंत चोरट्यांनी दुसऱ्या रूमची झडती घेत डब्यात ठेवलेले एक तोळ्याचे दागिने व बॅगमध्ये ठेवलेली ५२ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. त्या परत आल्या, मात्र त्यानंतर गावातील लाईट गेली. अंधाराचा फायदा घेत चोरट्यानी घरातून काढत पाय घेतला. बाहेरच्या दरवाजा उघडून जाताना दरवाज्याची कडी वाजल्याने त्या कोण आहेत म्हणत बाहेर आल्या. तेवढ्यात अनोळखी दोघे जण पळून जाताना त्यांनी पाहिले. घरात येऊन त्यांनी पहिले असता घरातील डबे उघडे आणि कपडे अस्ताव्यस्त पडले होते. तर दागिने व रक्कम ही गायब असल्याचे दिसून आले. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून जमादार उमेश आघाव हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version