केज दि.३ – केज तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना आरोग्यविषयक कांही गुंतागुंतीच्या तक्रारी असतील तर पूर्वी शेकडो किमीवर जाऊन उपचार घ्यावे लागत असत. तर अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत असे.परंतु मागच्या कांही वर्षांपासून केजमध्ये ही कांही निष्णात डॉक्टर्स आल्याने रुग्णांची मोठी सोय झाली आहे. आणि यापैकीच एक हॉस्पिटल म्हणजे योगिता बालरुग्णालयाचे नाव घ्यावे लागेल. या ठिकाणी डॉ.दिनकर राऊत आणि डॉ.हेमा राऊत यांच्यामुळे महिला व बालकांची मोठी सोय झाली असून दूरवर जाण्याची गरज राहिलेली नाही. आणि याचाच एक प्रत्यय नुकताच आला असून एका चार आठवड्याच्या बालकावर अतिशय जोखमीची शस्त्रक्रिया या रुग्णालयात पार पडली आहे व अवघ्या चार आठवड्याच्या बालकास जीवदान मिळाले आहे.
जन्मताच सदरील बाळाच्या जठराच्या स्नायू (CHPS) मध्ये अडथळा निर्माण होत होता.त्यामुळे सदरील बालकाला दूध पाजले की लागलीच उलट्या होण्याचा त्रास होता. परंतु या बाळावर केजच्या योगिता बाल रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्याने अखेर त्या बाळाला जीवदान मिळाले. भूम तालुक्यातील ईट येथे राहणारे नदीम काझी व फिजा काझी यांच्या चार आठवड्याच्या बाळाला सातत्याने उलट्या होत होत्या. अनेक ठिकाणी सदरील बाळाला दाखवले परंतु गुण येत नव्हता.परंतु केज येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. दिनकर राऊत यांनी बाळाच्या आजारपणाचे निदान (CHPS) केले व बाळास योगिता रुग्णालयात ऍडमिट करून घेतले. बाळास सतत उलट्या होत होत्या, दुध पचत नव्हते, बाळाची स्थिती ही गंभीर होण्याची शक्यता होती. बाळाचे वजन घटत चालले होते. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत डॉ. दिनकर राऊत यांनी त्या बाळावर योगिता रुग्णालया मध्येच तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतले. पालकांशी चर्चा करून डॉ. राऊत यांनी लातूर येथील लहान मुलांचे सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ.शिवाजी मुलगीर यांच्याशी संपर्क साधला. तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. बाळाचे तपासणीचे सर्व रिपोर्ट पाहिल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया आणि योग्य औषधोपचारांची गरज आहे हे लक्षात आल्यानंतर डॉ.मुलगीर यांनी त्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर केवळ दिवस त्या बाळाला वेंटीलेटरवर ठेवले आणि बाळाच्या तब्येतीत सुधारणा होत गेली. त्यानंतर बाळाला दूध देणे सुरू करण्यात आले त्याला दूध चांगले पचू लागले.आणि १७ मे ला ऍडमिट केलेल्या बाळाला दि.२३ मे रोजी रूग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) करण्यात आले. बाळ सुखरूप असल्याची खात्री झाल्याने पालकांनी डॉ. दिनकर राऊत , डॉ. शिवाजी मुलगीर, डॉ.हेमा दिनकर राऊत, डॉ. बाबू वाघमारे यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी मंगल मस्के,शीतल जाधव व सर्व टीमचे आभार व्यक्त केले.
दरम्यान, यापूर्वीही योगिता बाल रुग्णालयात पाचव्या महिन्यातच जन्माला आलेल्या बाळाला जीवदान मिळाल्याने राऊत दाम्पत्याचे कौतुक झालेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही रुग्णांची मोठ्या प्रमाणावर सोय होत असल्याने परिसरातील व बाहेर जिल्ह्यातील रुग्णही मोठया विश्वासाने योगिता बाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. तसेच यापूर्वीही सदरील रुग्णालयात जन्मतः व्यंग असलेल्या अनेक बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. तर तालुका स्तरावरील योगिता बाल रुग्णालय हे (NABH) कडून प्रमाणित करण्यात आल्याने आणखीनच रुग्णालयाची विश्वासार्हता वाढली आहे.