केज दि. ९ – उसने पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून २१ जणांनी लोखंडी गज, टांबी व काठीने मारहाण करीत ११ जणांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना केज तालुक्यातील जवळबन शिवारात घडली आहे. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील पैठण येथील झुंबर चंदर काळे ( वय ७० ) यांना उसने पैशाची मागणी केल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला असता जवळबन शिवारात ८ जून रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास आलेल्या २१ जणांनी लोखंडी गज, टांबी आणि काठीने हल्ला चढविला. या मारहाणीत झुंबर काळे यांच्यासह ११ जण जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांना गंभीर मार लागला आहे. ९ जून रोजी झुंबर काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २१ जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून सर्व आरोपी फरार आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रियाजोद्दीन शेख हे पुढील तपास करत आहेत.