केज दि.१५ — दारूच्या नशेत नेहमी आईला त्रास देणाऱ्या पित्याचा मुलाने धारदार कोयत्याने तोंडावर व हातावर वार करीत खून केला. त्यानंतर सोयाबीनच्या भुसकटात प्रेत पुरून ठेवल्याची घटना केज तालुक्यातील साळेगाव शिवारात १३ जून रोजी दुपारी घडली. दुसऱ्या मुलाने युसुफवडगाव पोलिसात ठाण्यात जाऊन वडिलांचा खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा प्रकार निदर्शनास आला. शिवाजी केशव हंकारे ( वय ५३, रा. जवळबन ता. केज ) असे खून झालेल्या पित्याचे नाव असून पवनकुमार हंकारे असे खून करणाऱ्या मुलाचे नाव आहे.
केज तालुक्यातील जवळबन येथील मयत शिवाजी केशव हंकारे ( वय ५३ ) यांना पत्नी, दोन मुले, तीन मुली असून दोन मुलीचा विवाह झालेला आहे. त्यांचा थोरला मुलगा पवनकुमार शिवाजी हंकारे हा पुण्याला कामाला असतो. त्याचा ही विवाह झाला असून त्याला तीन महिन्याची मुलगी आहे. शिवाजी हंकारे यांना दारूचे व्यसन असल्याने ते नेहमी दारूच्या नशेत पत्नी व मुलांना त्रास देत होता. मागील चार दिवसांपूर्वी दारूच्या नशेत शिवाजी हंकारे पत्नीला मारू लागले. शेजाऱ्यांनी भांडण सोडविले. त्यानंतर त्यांची पत्नी ही धाकटा मुलगा व मुलीला घेऊन तांबवा येथील भावाकडे गेल्या होत्या. ही माहिती समजल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा पवनकुमार हंकारे याने वडिलांना फोन करून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र उलट ते शिवीगाळ करून लागले. त्यामुळे पवनकुमार हा रागात १४ जून रोजी पहाटे पुण्याहून गावाकडे आला. त्याने घरी वडिलांचा शोध घेतला. दुपारी वडिलांची भेट झाल्यावर त्यांना दुचाकीवर बसवून सोबत दारूच्या बाटल्या घेऊन ते साळेगाव शिवारातील सदाशिव पारखे यांचे शेतात निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी आणले. तेथे पळसाच्या झाडाला दोघांनी दारू घेत असताना पवनकुमार याने वडील शिवाजी हंकारे यांना दारू सोडून द्या, तुम्हाला व्यसन मुक्ती केंद्रात नेतो, तुमच्यात बदल करा नसता तुम्हाला ठार मारुन टाकेन अशी धमकी देत अगोदर सोबत आणलेल्या कोयत्याने धारदार बाजूने न मारता उलट्या बाजूने हातावर, पायाच्या गुडघ्यावर मारले. मात्र त्यांनी दारू सोडणार नाही, वागण्यात बदल करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर त्याने धारदार कोयत्याने तोंडावर वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह पळसाच्या झाडापासून जवळच असलेल्या खोपीसमोरील शेतातील सोयाबीनच्या भुसकटात मृतदेह पुरून तो फिरत राहिला. दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी पवनकुमार हंकारे याने युसुफवडगाव पोलीस ठाण्यात जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ संदीप दहीफळे यांना वडिलांचा खून केल्याची माहिती दिली. मात्र त्यांना हा तरुण दारूच्या नशेत अथवा वेडसर असावा असे वाटले. त्यानंतर त्यांनी खात्री करण्यासाठी केज ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना माहिती दिली. त्यानंतर सपोनि संदीप दहिफळे व सहाय्यक फौजदार विलास तुपारे हे तरुणास घेऊन घटनास्थळी आले. केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, फौजदार राजेश पाटील, फौजदार वैभव सारंग, जमादार उमेश आघाव, पोलीस नाईक अशोक नामदास, संतोष गित्ते, बाळासाहेब अंहकारे, चाँद सय्यद, सचिन अहंकारे, विलास शेटे, महादेव बहिरवाल हे घटनास्थळी हजर झाले. यावेळी पवनकुमार शिवाजी हंकारे याने वरील घटनाक्रम कथन करून वडिलांचा मृतदेह सोयाबीनच्या भूसकटातून काढून दाखविला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला होता. याप्रकरणी केज पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
—————————————————————
अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेहरकर यांची भेट
———————————————————–
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी भेट देऊन वडिलांचा खून करणाऱ्या मुलांकडून केलेल्या कृत्याची माहिती जाणून घेतली.