केज दि.२० – केज पोलिसांनी दुचाकीवर फिरून गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीस पकडले. त्याच्याकडून १९ हजार २७१ रुपयांचा गुटखा, मोबाईल व दुचाकी असा ६६ हजार २७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना एक गुटखा विक्रेता गुटख्याचा माल घेऊन दुचाकीवरून साळेगाव मार्गे चिंचोलीमाळीकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून जमादार बालाजी दराडे, पोलिस नाईक सचिन अहंकारे, महादेव बहिरवाल, शीतल धायगुडे, चौधरी यांच्या पथकाने रविवारी सकाळी चिंचोलीमाळी येथील नागबेट चौकात सापळा लावून रतन कांताराम पारवे ( रा. उमरी रोड, केज ) यास दुचाकीवरून ( एम. एच. ४४ ई ३९२९ ) गुटखा घेऊन जाताना पकडले. त्याची झडती घेतली असता राजनिवास गुटखा ६२ पुडे, बाबाजी गुटखा ११ पुडे, विमल गुटखा १० पुडे, रॉयल व व्ही. – १ तंबाखूचे २० पुडे, प्रीमियम एक्स रापरानी जर्दा ६४ पुडे असा १९ हजार २७१ रुपयांचा गुटखा मिळून आल्याने या गुटख्यासह १२ हजार रुपयांचा मोबाईल, ३५ हजार रुपयांची दुचाकी असा ६६ हजार २७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याने हा गुटखा अकबर नासेर पठाण ( अजीज पुरा, केज ) याच्याकडून आणल्याचे सांगितले. जमादार बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून रतन पारवे, अकबर पठाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार जसवंत शेप हे पुढील तपास करत आहेत.