अंबाजोगाई दि.२२ – केलेल्या विकासकामाची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई अंबाजोगाईत कार्यालयातच बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास केली. संजयकुमार कोकणे असे लाच घेताना पकडलेल्या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ते अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी कार्यरत आहेत. त्यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत निधीतून केलेल्या कामांची प्रलंबित देयके करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडे मागितली होती. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीचा सापळा रचून बीडच्या पथकाने लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांना रंगेहाथ पकडले.