Site icon सक्रिय न्यूज

घरगुती कारणातून तीस वर्षीय तरुणाची आत्महत्या…….!

घरगुती कारणातून तीस वर्षीय तरुणाची आत्महत्या…….!
केज दि.२७ – पत्नी नांदत नसल्याच्या कारणावरून एका ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिंचोलीमाळी ( ता. केज ) येथे रविवारी ( दि. २६ ) रात्री उघडकीस आली. दीपक सर्जेराव नखाते असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
       चिंचोलीमाळी ( ता. केज ) येथील दीपक सर्जेराव नखाते ( वय ३० ) या तरुणाचा विवाह झाल्यानंतर त्याला मुलगी झाली होती. मात्र मागील काही महिन्यांपासून त्याची पत्नी ही मुलीला घेऊन माहेरी राहत होती. तर दीपक हा आईवडिलांकडे गावी राहत होता. काही दिवसांपूर्वी आईवडील हे मजुरीच्या निमित्ताने बाहेरगावी होते. पत्नी नांदत नसल्याच्या कारणावरून आलेल्या नैराश्यातून दीपक नखाते याने टोकाची भूमिका घेतली. रविवारी दुपारी घरी कोणी नसताना घरातील कपडे व इतर वस्तू पेटवून देऊन राहत्या घरात लोखंडी आडूला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेची माहिती मिळताच केज ठाण्याचे फौजदार राजेश पाटील, जमादार राम यादव, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे, राजू गुंजाळ यांनी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. सोमवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून चिंचोलीमाळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. महादेव शिवाजी नखाते यांच्या माहितीवरून केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
     दरम्यान, दीपक हा त्याच्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या निधनाने नखाते कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेअर करा
Exit mobile version