मुंबई दि.२८ – राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्यात आता वेगवान हालचाली पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवरुन परतल्यानंतर आता थेट राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत.
दिल्लीत फडणवीसांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केलीय. त्यानंतर तातडीने ते मुंबईत दाखल झाले. आता ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्यासह अजून काही भाजप नेते आहेत. त्यामुळे राज्याच्या सत्ता संघर्षात आता भाजप आणि राज्यपालांची अधिकृत एन्ट्री झाल्याचंच पाहायला मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीवारीवर होते. राज्यातील राजकीय स्थितीवर भाजपची रणनिती दिल्लीत ठरतेय. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रसिद्ध वकील महेश जेठमलानीही होते. दोन्ही नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर फडणवीस संध्याकाळी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर लगेच फडणवीस आणि भाजप नेते राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता वेगवान हालचाली सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यासोबत 10 आमदार उद्या मुंबईत येऊन राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचं बोललं जातंय. शिंदे गटाकडून राज्यपालांना एक पत्र दिलं जाणार असून त्यात सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता फडणवीस आणि राज्यपाल कोश्यारी यांची ही बैठक अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
राज्यपालांनी येत्या 30 तारखेला विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले असल्याचे एक पत्र व्हायरल झाले होते.त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. परंतु ते पत्र चुकीचे असल्याचे राजभवनातून स्पष्ट करण्यात आले असल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. तर मविआ सरकारने बहुमत सिद्ध करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.