मुंबई दि.१ – राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडे रात्री साडेबाराच्या सुमारास सागर या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीचं कारण आणि भेटीमधील तपशील अद्याप कळू शकलेला नाही. धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात.
महाराष्ट्रातील राजकारणात 30 जून हा दिवस नाट्यमय घडामोडींनी भरलेला होता. एकापाठोपाठ एक ट्विस्ट पाहायला मिळत होते. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर करणं हा त्यामधील सर्वात मोठा ट्विस्ट ठरला. पण या धक्कातंत्राची मालिका रात्र उलटल्यानंतरही संपली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी रात्री साडेबारा वाजता देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचं समजतं. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांची भेट घेणं याची चर्चा सुरु झाली आहे. धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होती का, या भेटीत उद्याच्या राजकारणाची काही बिजे रोवली गेली आहेत का हे येणाऱ्या काळात कळेल.