मुंबई दि.५ – हवामान खात्याकडून (आयएमडी) पुढील पाच दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला गेला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्येे हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
एनडीआरएफच्या टीम रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.
काल (04 जुलै) रात्री झालेल्या पावसानंतर मुंबईतील अनेक भागांत काही काळ पाणी साचले होते. आता पाऊस थांबला असून पाणी देखील ओसरले आहे. काल बोरीवली, शीव, चेंबूर, वांद्रे आणि अंधेरी आदी भागात पाणी साचल्याने रहिवाशी आणि पादचाऱ्यांचे हाल झाले. मुंबईतील पावसाचा परीणाम लोकल रेल्वेवर झाला आहे आणि रेल्वेमार्ग विस्कळीत झाला आहे. त्यामुळे वाहतुक 20 मिनिटें उशीराने सुरु आहे.
कोकणात सतत बरसणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी नद्यांना पुर येऊन गावात पाणी शिरले आहे. काही ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, जगबुडी, काजळी व गाढी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या भागातील नागरिकांना सुचना देणे, त्यांना सुरक्षित स्थळी हलविणे आदी सुचना प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, उत्तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रांत मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 5 जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळ वारा व वीजेच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल. याचबरोबर, 6 आणि 7 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.