केज दि.६ – राज्यात अनेक भागात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. परंतु केज तालुका अद्याप कोरडाच असल्याने थोड्याफार पावसावर केलेल्या पेरण्या दुबार करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे पुरवण्याची मागणी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे यांनी केली आहे.
जून महिन्यात झालेल्या मध्यम पावसात तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या तर कांही शेतकऱ्यांच्या अद्याप पेरण्याच झालेल्या नाहीत. सुरुवातीला बी बियाणांची जुळवाजुळव करून पेरण्या केल्या त्यात त्यांच्याकडे जे काही पैसे होते ते खर्च केले. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या करून घेतल्या त्यांच्यापुढे नवीनच संकट उभे राहिले असून दुबार पेरणीच्या सावटाखाली शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
केज तालुक्यातील डोंगराळ आणि हलक्या जमिनीत ज्या सुरुवातीला पेरण्या झाल्या त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने पिके उगवलेली नाहीत. त्यामुळे महागामोलाचे बी बियाणे व खते वाया गेले आहेत.आता पुन्हा नव्याने पेरणी करायची म्हटले तर आर्थिक कोंडी झालेली आहे.त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात शेतकऱ्यांना मदत म्हणून मोफत बी बियाणे शासनाने पुरवण्याची मागणी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे यांनी केली आहे.