केज दि.१५ – एका खाजगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करणारा ४६ वर्ष वयाचा इसम बेपत्ता झाला असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दिली आहे.
केज तालुक्यातील आरणगाव येथील नागनाथ जगताप हे पुणे येथील मातोश्री या खाजगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करीत आहेत. ते १५ ते २० दिवसा नंतर नियमित आरणगाव या त्यांच्या गावी कुटुंबात येत असत; परंतु दि. १४ जून रोजी ते कामाला गेले. त्या नंतर दि. २२ जून पर्यंत तो फोनद्वारे कुटुंबाच्या कायम संपर्कात होते. मात्र त्या नंतर दि. २३ जून पासून त्याचा फोन आला नाही आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांची पत्नी अनिता जगताप हिने पुणे येथील मातोश्री कंपनीत चौकशी केली असता नागनाथ जगताप आले नसल्याची त्यांनी माहिती दिली. त्या नंतर त्यांच्या कुटुंबीयांनी नारेवाडी, सादोळा, साळेगाव, पुणे आणि नातेवाईक असलेल्या परिसरात शोध घेतला असता ते अद्याप पर्यंत मिळुन आलेले नाहीत. म्हणून नागनाथ यांची पत्नी अनिता जगताप हिने दि. १४ जुलै रोजी केज पोलीस ठाण्यात नागनाथ जगताप बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे.
दरम्यान, नागनाथ जगताप यांचा वर्ण सावळा, उंची ५ फूट ६ इंच, बांधा मध्यम, नाक सरळ, डोळे मध्यम, अंगात फिका गुलाबी रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट, पायात चप्पल आणि मराठी भाषा बोलता लिहिता व वाचता येते असे वर्णन केले आहे. सदर वर्णनाचा इसम कुणास आढळून आला किंवा त्याच्या विषयी कुणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ केज पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी केले आहे.