केज दि.२१ – अपघातात जखमी झाल्याने औषधोपचारासाठी कर्ज काढून खर्च केला होता. ते कर्ज फेडायचे कसे ? या चिंतेतून एका ४० वर्षीय शेतकऱ्याने घराच्या दरवाज्याच्या कोंड्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना राजेगाव ( ता. केज ) येथे गुरूवारी ( दि. २१ ) सकाळी उघडकीस आली. सुग्रीव देविदास जाधव असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
राजेगाव ( ता. केज ) येथील सुग्रीव देविदास जाधव ( वय ४० ) यांचा सहा महिन्यांपूर्वी दुचाकीवरून पडून अपघात झाला. त्यात सुग्रीव जाधव हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचारासाठी लागणारा खर्च कर्ज काढून करण्यात आला होता. तर मागील दोन वर्षे शेतात काही पिकले नव्हते. त्यामुळे झालेल्या कर्ज कसे फेडायचे ? या विचाराने सुग्रीव जाधव हे चिंताग्रस्त बनले होते. शेवटी कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी टोकाची भूमिका घेतली. पत्नी व मुले झोपल्यानंतर बुधवारी मध्यरात्री सुग्रीव जाधव यांनी दरवाज्याच्या कोंड्याला गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवन संपविले. या घटनेची माहिती मिळताच जमादार अशोक मेसे, जमादार अभिमान भालेराव, पोलीस नाईक रशीद शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचे चंद्रकांत देविदास जाधव यांच्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बेरोजगारीला कंटाळून केवड येथे तरुणाची आत्महत्या
बेरोजगारीला कंटाळून एका ३३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात पत्र्याच्या लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केवड ( ता. केज ) येथे बुधवारी ( दि. २० ) रात्री उशिरा उघडकीस आली. अजित वसंत कोल्हे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
केवड ( ता. केज ) येथील अजित वसंत कोल्हे ( वय ३३ ) या तरुणाचे बीएस्सी बीएड शिक्षण झाले होते. तो खाजगी नोकरी ही करीत होता. मात्र कोरोना महामारीच्या काळात त्याची नोकरी गेली होती. तेव्हापासून ते बेरोजगार होता. शेवटी बेरोजगारीला कंटाळून अजित याने टोकाचे पाऊल उचलले. बुधवारी रात्री घराच्या पत्र्याच्या लोखंडी आडूला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन अजित कोल्हे याने जीवनयात्रा संपविली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे, पोलीस शिपाई रवी फड यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे हे पुढील तपास करत आहेत.