मुंबई दि.२२ – मागील आठवड्यात पावसाने जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना झोडपून काढले. मुंबई शहराची दोन दिवस तुंबई झाली होती. तसेच मुंबई, पुणे आणि ठाणे यांसारख्या विविध महानगरांना पाणीपुरवठा करणारी धरणे देखील तुडूंब भरली आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत नद्या नाले तुडूंब भरुन वाहत होते. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते.
आता गेले दोन दिवस राज्यांतील सर्व भागांत पावसाचा जोर कमी झाला असला तरी, आता उद्यापासून पुढील चार दिवस पुन्हा मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे प्रशासन आणि नागरीकांना खबरदारी बाळगण्याचा आणि सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. राज्यात मुंबई, कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत रविवार आणि सोमवार दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, आठवडाभर झालेल्या तुफान पावसानंतर गेले दोन दिवस पाऊस थोडा थंडावला असून काही ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. आता पुन्हा एकदा पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे लांबचा प्रवास टाळावा तसेच खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.