मुंबई दि.३० – मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यापासून एकनाथ शिंदे यांनी अनेक निर्णयांचा सपाटा लावलाय. अवघ्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांनी 500 पेक्षा अधिक जीआर काढले आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी आता आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. राज्यात दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यात कोरोनाच्या 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच कोणत्याही निर्बंधांशिवाय दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मुंबई आणि ठाण्यात राजकीय नेत्यांकडून दहीहंडीचं आयोजन केलं जातं. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हा आणि यासारखे अनेक मुद्दे लक्षात घेत दहीहंडीला शासकीय सुट्टी जाहीर करावी, या मागणीचं पत्र प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं होतं. यानंतर आता मुख्यमंत्री 19 ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी जाहीर करणार आहेत.