केज दि.३१ – अज्ञात चोरट्यांनी एका माजी सैनिकाचे घर फोडून नगदी १८ हजार रुपये, एलईडी, भांडे, कारची चावी असा ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना केज शहरातील कळंब रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील माजी सैनिक दिनेश संपत्ती घोडके यांचे कुटुंब केज शहरात कळंब रस्त्यावरील डीएड कॉलेजच्या समोरील भागात वास्तव्यास आहे. तर त्यांच्या पत्नी कुसुम घोडके या बनसारोळा येथे आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. २४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता दिनेश घोडके हे जावई आजारी असल्याने कोल्हापूरला मुलीकडे गेले होते. तर त्यांची पत्नी कुसुम घोडके या लातूरला शिक्षणासाठी असलेल्या मुलीकडे गेल्या होत्या. त्यांच्या घराला कुलूप पाहून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घराच्या पाठीमागील भिंतीवरून आत येत गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घराची झडती घेऊन पर्समध्ये ठेवलेले नगदी १८ हजार रुपये व १५ हजार रुपये किंमतीचा एलईडी, पितळी भांडे आणि कारची चावी असा ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. कुसुम घोडके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे करत आहेत.