बीड दि.६ – जिल्ह्यातील मांडवा येथील शेतकरी पुत्र अविनाश साबळे याने बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्य पदक भारताला मिळवून दिलं आहे. अविनाश ने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 8:11:20 अशी वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकलं आहे. विशेष म्हणजे या पदकासह अवघ्या तासाभरात भारताने ट्रॅक अँड फिल्डमध्ये दुसरे पदक जिंकले आहे. काही वेळापूर्वीच प्रियांका गोस्वामीने 10 किमी चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं होतं. ज्यानंतर आता अविनाशनेही रौप्य जिंकलं आहे.
विशेष म्हणजे अविनाशने हे पदक जिंकत अविनाश याने याआधी देखील अनेक वेळा चमकदार कामगिरी केली आहे. पण यावेळची कॉमनवेल्थ स्पर्धा त्याच्यासाठी खूप खास होती. अविनाशने यावेळी आपली सर्वोत्तम कामगिरी करत 8 मिनिटे 11.20 सेकंद घेत शर्यत जिंकल्यामुळे एक नॅशनल रेकॉर्ड आणि स्वत:चा बेस्टही सेट केला आहे. काहीशा फरकाने तो सुवर्णपदकापासून वंचित राहिला.
दरम्यान बीडच्या सुपुत्राने रौप्यपदक जिंकल्याने देशासह जिल्ह्याची मान उंचावली असून जिल्हावासीय अविनाशचे तोंडभरून कौतुक करत आहेत.